‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न’,शरद पवारांचा केंद्रावर निशाणा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं मोठा दणका दिलाय. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख इतकी असल्याची माहितीही ईडीकडून देण्यात आलीय. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय.
यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे. ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न बनल्याची टीका पवारांनी केंद्रावर निशाणा साधत केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशातील सर्वात मोठा प्रश्न बनलाय.
आपण जी आकडेवारी दिली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छपणे सांगते की राजकीय किंवा अन्य हेतुनं कुणालातरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. खरं सांगायचं म्हणजे गेल्या 5 – 6 वर्षात ही ईडी नावाची संस्था इथं बसलेल्या कुणाला माहिती नव्हती. मात्र आता ही ईडी गावागावात पोहोचलीय. या सगळ्या गोष्टीचा गैरवापर दुर्दैवानं सुरु आहे. बघू आता त्याला काही पर्याय निघतो का’, अशा शब्दात शरद पवार यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली.