राज्यातील बोगस शाळांविरोधात कारवाई
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात गेल्या काही वर्षांपासून बोगस शाळांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळत आहे. या विरोधात अनेकदा तक्रारी देखील करण्यात आलेल्या आहेत. या बोगस शाळांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य देखील धोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पण आता राज्यातील या बोगस शाळांविरोधात कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांकडून देण्यात आलेले आहेत. राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना येत्या ३० एप्रिलपर्यंतचा शाळा बंद करण्याचा अल्टिमेटम देत हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि राज्यातील इतर भागांमधील बोगस शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अनेकदा अनधिकृत शाळांमुळे पालकांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना घडतात. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होते. त्यामुळे शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांबाबत अनेकदा सूचना दिल्या गेलेल्या आहेत. राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या सर्व शाळा दिनांक ३० एप्रिल अखेर पर्यंत बंद करून तसा अहवाल सादर करण्यासंदर्भात शालेय शिक्षण आयुक्त यांनी याआधी आदेश दिले होते. त्यामुळे या अनुषंगाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व शाळा बंद करून सदर शाळेतील विद्यार्थ्यांचे अधिकच्या शासन मान्यता प्राप्त शाळेत समायोजन करून सदर अहवाल २८ एप्रिलपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ज्या अनधिकृत शाळांवर बंदची कारवाई करण्यात येणार नाही, अशा शाळांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात येणार आहे. तसेच त्या शाळांकडून दंड स्वरूपात विहित रक्कम वसूल करण्याची सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे. तर कारवाई पूर्ण करून तसा अहवाल शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षकांनी सादर न केल्यास अनधिकृत शाळा सुरू ठेवण्यास सहकार्य केल्याबद्दल सर्व जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांवर असणार आहे. त्यामुळे दुर्लक्ष न करता तातडीने ही कारवाई पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत.