आदित्य ठाकरे आता केंद्राच्या रडारवर; प्रदूषण खात्याच ऑडिट करणार
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा ।। राज्यातील सत्तारानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदार, नगरसेवर आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली आहे. अशात आता भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. युवासेनाप्रमुख आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मोदी सरकारच्या रडारवर आल्याचे चित्र आहे. कारण, आता मोदी सरकारने आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे आणि कामकाजाचे मोदी सरकारकडून ऑडिट होणार आहे.
आदित्य ठाकरेंकडील खात्याचे ऑडिट सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडिट सुरुही केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.
यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. दरम्यान नव्या सूचना, उपाययोजना होणार असतील तर चांगलेच, पण उगाच मंडळाची बदनामी होऊ नये अश अपेक्षा कर्मचारी आणि अधिका-यांनी व्यक्त केली आहे
दरम्यान आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते संवाद यात्रेच्या माध्यमातून विशेषतः शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जात आहेत. तिथे ते शिवसेनेची बाजू पटवून देत शिवसेना पुन्हा भरारी घेईल, असा आशावाद कार्यकर्त्यांत निर्माण करत आहेत. त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.