एलपीजी गॅस सिलेंडर नंतर आता पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नरेंद्र मोदी सरकारने रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करून
जनतेला मोठी भेट दिली. गेल्या काही वर्षात एलपीजी सिलेंडर ४५० रुपयांहून थेट ११५० रुपयांच्या घरात पोहचले. गेल्या काही वर्षात घरगुती सिलेंडरचा भाव गगनाला भिडला. त्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले. निवडणुकींच्या तोंडावर हे निर्णय घेण्यात येत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे दरात पण कपात करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पेट्रोल-डिझेल खरंच होईल स्वस्त?
गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. देशात पेट्रोल-डिझेलचा मोठा भडका उडाला होता. जनतेने रोष व्यक्त केल्यावर गेल्या वर्षी मे महिन्यात पेट्रोल-डिझेलवरील शुल्कात कपात करण्यात आली. काही राज्यांनी त्यांच्या मूल्यवर्धित करात कपात केली. त्यामुळे इंधनाचे भाव १० ते २० रुपयांनी कमी झाले. केंद्र सरकारने गेल्या वर्षी २२ मे रोजी उत्पादन शुल्क घटविले. काही राज्यांनी पण मूल्यवर्धित करात कपात केली. पण त्यानंतर आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झाली नाही. गेल्या ११ महिन्यांपासून हा रेकॉर्ड अबाधित आहे
या वर्षांच्या अखेरीस मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये निवडणुकांचे पडघम वाजतील. या राज्यात निवडणूक आयोग कामाला लागले आहे. निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी सुरु झाली आहे. स्थानिक राज्य सरकारांनी पण सवलतींचा पाऊस पाडला आहे. या राज्यात सत्ता पालट होऊ नये यासाठी राज्य सरकार विविध सवलती देत आहे. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपातीचा निर्णय होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अशा वाढल्या किंमती
१ एप्रिल २०२१ मध्ये गॅस सिलेंडरच्या किंमती ८०९ रुपये होत्या
१ एप्रिल २०२२ मध्ये गॅस सिलेंडर ९४९.५ रुपयांना मिळत होते
जुलै २०२२ मध्ये एलपीजीची किंमत १०४५ रुपयांवर पोहचली
मार्च २०२३ एलपीजीची किंमत ११०३ रुपयांवर पोहचली
मागील चार वर्षांत केंद्र सरकारने एलपीजीवरील सबसिडी कमी केली. २०१८-१९ मध्ये ३७,२०९ कोटी रुपये सबसिडी पोटी देण्यात आले होते. २०१९-२० मध्ये एलपीजीवरील सबसिडी कमी होऊन ती २४,१७२ कोटी रुपये झाली. २०२०-२१ मध्ये ११,८९६ कोटी रुपये तर २०२१-२२ मध्ये १,८११ कोटी रुपयांवर सबसिडी येऊन ठेपली. आता ग्राहकांच्या खात्यात अवघे ३,७५ रुपयांच्या जवळपास सबसिडी जमा होते.