आता ठरल! रावेर लोकसभा मतदार संघात खडसे विरुद्ध खडसे लढत होणार? एकनाथ खडसे यांनी केलं स्पष्ट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, भाजपने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली .त्यात रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. महविकास आघाडीत हा मतदार संघ शरद पवार यांच्या वाट्याला आला असून या मतदार संघात कोणता उमेदवार द्यायचा यासंदर्भातही महत्वाची बैठक होती.
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या रक्षा खडसे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. रक्षा खडसे विरोधात महाविकास आघाडीकडून एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होत होती. असे चर्चिले जात होते की, सूने विरोधात सासरे किंवा नणंद , मात्र आता रावेरमध्ये खडसेंविरुद्ध खडसे अशी लढत होणार असल्याचे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
रावेर लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित पार पडली. रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला आला असून या मतदार संघात कोणता उमेदवार द्यायचा यासंदर्भात ही महत्वाची बैठक होती. या बैठकीसाठी एकनाथ खडसे रोहिणी खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, रवींद्र पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना रावेरमध्ये खडसेविरुद्ध खडसे लढत होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय सांगितलं एकनाथ खडसे यांनी?
“रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढाई होणार नाही. मी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढणार नाही. तसेच रोहिणी खडसे यांनी विधानसभा लढवली होती, त्यामुळे त्याही उमेदवार नसणार आहेत. आम्ही सात – आठ इच्छुकांची छाननी केली आहे, “त्यातून एक जण उमेदवार राहिलं, असे एकनाथ खडसे म्हणाले.
रावेर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपच्या दुसऱ्या यादीत या मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीमध्ये आहेत. तर त्यांची सून म्हणजेच रक्षा खडसे भाजपत आहेत. रक्षा खडसे २०१९ च्या निवडणुकीतही चांगल्या मतांनी निवडून आल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढणार नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केल्याने सगळ्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. तसेच रावेर मतदार संघात राष्ट्रवादी निवडून येणारा उमेदवार देईल व तो निवडूनही येईल असे खडसेंनी पत्रकार परिषदेत सांगीतले.तर रोहिणी खडसे यांनी लोकसभा लढविण्याचा विचारही केला नाही. त्या मुक्ताईनगरमधून विधानसभा लढविण्यास इच्छुक आहेत.