थेट नगराध्यक्ष निवड,प्रभाग रचना, ओबीसी राजकीय आरक्षणच्या आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी कडे लक्ष्य
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। थेट नगराध्यक्ष पदाची निवड, प्रभाग रचनेत केलेले बदल याविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
राज्य सरकारने प्रभाग रचनेत केलेले बदल, थेट नगराध्यक्ष पद निवड याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसंच, जुलै महिन्यात ओबीसी राजकीय आरक्षण मिळाले. परंतु, ९२ नगरपरिषदांमध्ये हे आरक्षण नसल्याने राज्य सरकारने कोर्टात याचिका दाखल केली आहे. अशा विविध याचिकांवरील सुनावणीमुळे राज्यतील महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये सध्या प्रशासकीय राजवट आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकांवर प्रशासकीय राजवट असल्याने अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सर्वोच्च न्यायालायच्या आजच्या सुनावणीनंतर महापालिकेच्या निवडणुका केव्हा होणार याबाबत स्पष्टता होणार आहे. मुंबईसह 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या, 207 नगरपालिका, 13 नगरपंचायती निवडणुकांची प्रक्रिया प्रक्रिया संदर्भातील याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.