भाजप खासदारांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ खासदारांचं तिकीट कापलं जाणार?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येत्या काही काळात देशात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. विशेष म्हणजे भाजप पक्षातून मोठी बातमी समोर आलीय. भाजपने महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ सुरु केलं आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. यापैकी ४५ जागांवर आपले उमेदवार निवडून आणायचेच, असा निर्धार भाजपकडून करण्यात आलाय. त्यामुळे भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
२०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे. त्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून भाजप आता विद्यमान खासदारांपैकी काही खासदारांचं आगामी निवडणुकीत तिकीटं कापण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपमधील काही खासदारांची धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे अकार्यक्षम खासदारांचा यात समावेश असू शकतो.
भाजपकडून खासदारांचा आढावा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांचं तिकीट कापलं जाणार आहे. लोकसभेसाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरु आहे. विशेष म्हणजे मुंबईत सुद्धा काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येतोय. जे. पी. नड्डा हे नुकतंच मुंबई आणि पुणे दौऱ्यावर आले होते. या दरम्यान जे. पी. नड्डा यांची भाजपच्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत जे. पी. नड्डा यांनी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची चर्चा आहे.
अमित शाह यांची शिंदे-फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा
याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी अमित शाह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.
आतली बातमी, ‘या’ खासदारांचं तिकीट कापलं जाणार
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी सुरु आहे. भाजपकडून प्रत्येक खासदाराचा रिपोर्ट कार्ड बनविण्यात आलाय. ज्या खासदारांची कामगिरी सुमार असेल त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे. त्याऐवजी भाजप आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज्यात मिशन ४५ राबवयाचं आहे. भाजपला हे मिशन सत्यात साकार करायचं आहे.
आता कोणतीही जोखीम भाजपला घ्यायची नाही. एखाद्या खासदाराची प्रतिमा खराब झाली असेल किंवा जनतेच्या मनात खासदाराबद्दल नाराजी निर्माण झाली असेल तर त्या खासदाराचं तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्लॅन भाजपचा आहे. पण भाजपची ही रणनीती काही विद्यमान खासदारांसाठी धोक्याची आहे. भाजपच्या या रणनीतीनुसार आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
काही खासदारांचं तिकीट कापलं गेलं तर ते बंड पुकारून दुसऱ्या पक्षाच्या तिकीटावर किंवा अपक्ष निवडणूक लढतील का? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात तसं झालं तर भाजपचंच नुकसान होणार आहे. कारण त्यामुळे मतं विभागली जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात याबाबत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पण सध्या सूत्रांकडून मिळालेली माहिती भाजप खासदारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा