उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का, वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच उपनेत्याचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र!
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। उद्या १९ जून, शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन. पण या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ठाकरे गटाचं उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होतं. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसं पत्र शिशिर शिंदे यांनी ठाकरेंना लिहिलं आहे.
मातोश्रीवर जात शिशिर शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय. पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा देतानाच शिशिर शिंदे यांनी पत्र लिहिलं आहे. त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं आहे. या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका मांडली आहे.
राजीनाम्याचं कारण काय?
पक्षात काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. पक्षात घुसमट होत असल्याचं शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
कोण आहेत शिशिर शिंदे?
१९ जून २०१८ ला शिशिर शिंदे यांची शिवसेनेत घरवापसी झाली होती. घरवापसीनंतर तब्बल ४ वर्ष पक्षात राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे यांची पक्षाच्या उपनेते पदी वर्णी लागली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात सुरू झालेल्या घडामोडींमध्ये शिशिर शिंदे यांना उपनेते करण्यात आलं.
आधी शिवसेना मग मनसे अन् पुन्हा शिवसेना असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास राहिला. त्यांनी २०१८ ला मनसेला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेत असताना शिशिर शिंदे हे पक्षाचे नेते होते. २००९ ला भांडुप विधानमतदार संघातून आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिशिर शिंदे यांनी राज ठाकरे यांची साथ दिली होती