शिंदे सरकारचा ‘मविआ’ला आणखी एक दणका ; ‘या’ मोठ्या योजनेला स्थगिती!
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या अवघ्या एक दिवस आधी मंजुरी मिळालेली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची ३८१ कोटी रुपयांची प्रादेशिक पर्यटन विकास योजना सुरू ठेवण्याबाबत शिंदे सरकार संभ्रमात आहे.
सत्तेत येताच जुलैमध्ये शिंदेंनी योजनेला स्थगिती दिली. नंतर २०२२-२३ सोबतच गेल्या वर्षीच्या कामांवरील स्थगिती उठवून निधीही मंजूर केला. मात्र, निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याआधीच पुन्हा एकदा या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. महाराष्ट्र सरकारनं पुन्हा एकदा GR जारी केला असून २ नोव्हेंबरच्या GR ला स्थगिती दिलीय. याआधी पर्यटन मंत्रालयाच्या महाविकास आघाडीच्या प्रकल्पांना परवानगी दिली होती. त्यानंतर जुलै महिन्यात एक जीआर जारी करण्यात आला. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पर्यटन आणि संस्कृती विभागाचं काम थांबवण्यात आलं. नंतर २ नोव्हेंबरला काही प्रकल्पांना परवानगी दिली. मात्र, आता १७ नोव्हेंबर रोजी आणखी एक GR जारी करण्यात आला असून २ नोव्हेंबरच्या GR ला त्यांनी स्थगिती दिली आहे.
उद्धव सरकारचा पाडाव करून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. नवीन सरकारनं मविआचे निर्णय फिरवण्यास सुरुवात केली. यात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेचाही नंबर लागला. शिंदे सरकारनं २५ आणि २८ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय काढून या योजनेअंतर्गत जिल्हास्तरावरील ३८१.३० कोटींचे, तर एमटीडीसीचे २१४.८० कोटी अशा ५९६ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. याबाबत पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याची सूचना करण्यात आली. यानंतर मात्र २ नोव्हेंबर २०२२ रोजी सरकारनं पुन्हा स्वत:चा निर्णय फिरवत स्थगिती दिलेल्या कामांना मंजुरी दिली. एवढंच नव्हे तर २०२१-२२ च्या कामांवरील स्थगितीही मागे घेत ती सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचा शासन निर्णय काढला. प्रशासन कागदोपत्री कामाला लागले असताना १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा २०२०-२१ आणि २०२१-२२ च्या कामांना स्थगिती देण्याचा जीआर काढला. पुढील आदेशापर्यंत कार्यवाही न करण्याचे निर्देश दिले आहेत.