भाजप उमेदवारावर तब्बल २४२ गुन्हे, कोण आहे हा उमेदवार, गुन्हे कोणते आहेत?
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. या दरम्यान भाजपने वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे एनडीएचे उमेदवार असलेल्या सुरेंद्रन यांच्या विरुद्ध २४२ गुन्हे दाखल आहेत. ते केरळ भाजपचे अध्यक्ष देखील आहेत. कोणते गुन्हे आहेत त्यांच्यावर,हे ही पाहण खूप महत्वाचं आहे.
निवडणुक आयोगाच्या सुचनांनुसार नुकतेच सुरेंद्रन यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्रात आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रकाशित केली आहे. त्यांच्यासोबतच एर्नाकुलम येथील उमेदवार के. एस राधाकृष्णन यांच्याविरोधात देखील २११ गुन्हे दाखल आहेत. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक उमेदवारांना आपल्याविरोधात दाखल सर्व गुन्ह्यांची माहिती कुठल्याही वृत्तपत्रात प्रकाशित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
यापैकी बहुतांश प्रकरणे २०१८ मध्ये साबरीमाला आंदोलनासंबंधीत आहेत, जे बहुतेक कोर्टात आहेत, जेव्हा पक्षाचे नेते आंदोलन किंवा बंद पाळण्याचे आवाहन करतात तेव्हा पोलीस त्या प्रकरणी गुन्हा नोंदवतात, असं स्पष्टिकरण भाजपचे नेते जॉर्ज कुरियन यांनी याबद्दल बोलताना दिले. तसेच सुरेंद्रन यांच्याविरोधातील गुन्ह्यांची माहिती देताना जॉर्ज कुरियन म्हणाले की यापैकी २३७ केस या साबरीमाला आंदोलनाशी संबंधीत आहेत तर ५ केरळमधील विविध आंदोलनाशी संबंधीत आहेत. दरम्यान अन्य पक्षांच्या उमेदवारांची प्रकरणे अद्याप समोर आलेली नाहीत.