ब्रेकिंग : राज्यभरातील अनेक जिल्ह्यात रात्री पासून बत्तीगुल, अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा सरकारचा इशारा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात महावितरणचे खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मध्यरात्री ३,४ वाजल्यापासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्रीपासूनच बत्तीगुल झाल्यामुळे अनेक जिल्हे अंधारात गेले आहेत. दरम्यान, वीज कर्मचारी संपावर गेल्यास अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांच्या ३० संघटनांनी अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत तीन दिवसांचा संप पुकारला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. राज्यातील अनेक भागात असेच चित्रं सुरू आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हा संप सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचे हाल होताना दिसत असून अजून पुढचे दोन दिवस काढायचे कसे? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे.महावितरणचे वीज कर्मचारी संपावर गेल्याचा फटका राज्यातल्या ग्रामीण भागातही बसत आहे. राज्यातील अनेक ग्रामीण भागातही बत्ती गुल झाली आहे. आधीच ग्रामीण भागात लोडशेडिंगचं संकट असतं. त्यात आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारीच उपलब्ध नाहीत. तसंच वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो पुर्ववत करणार नसल्याचं पत्रकही संपकरी वीज कर्मचा-यांनी काढलंय. तेव्हा ग्रामीण भागातला वीजपुरवठा कधी पुर्ववत होणार हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.या मुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. इन्व्हरटरही बंद झाल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे.