Big Breaking ; खाद्यतेल लिटरमागे २० ते ४० रुपयांनी स्वस्त, मोठा दिलासा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। सर्वसामान्य नागरिक महागाईच्या आगीत होरपळून निघत असून पेट्रोल ,डिझेल पासून ते एलपीजी पर्यंत आणि खाद्यपदार्थांपासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. महागाई गगनाला भिडली असल्याने वाढत्या महागाईमुळे खरेदीचे प्रमाण देखील घटले आहे. मात्र वाढत असलेल्या माहागाईत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने त्याचा परिणाम भारतात देखील झाला आहे. देशात खाद्यतेलाचे दर घसरले आहेत. १५ लिटर तेलाच्या प्रति डब्यामागे दरात ३०० ते ७०० रुपयांची घसरण झाली आहे. तर किरकोळ बाजारातही प्रति लिटर मागे तेल २० ते ४० रुपयांनी स्वस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत होते.
रशिया, युक्रेन युद्धाचा फटका
मागील अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा मोठा फटका या दोन देशांना बसला सोबतच त्याचा मोठा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर देखील झाला आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन देश अनेक वस्तूंची निर्यात करतात. मात्र युद्धामुळे निर्यात ठप्प असल्याने अनेक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला, परिणामी भाव वाढले. भारत रशिया आणि युक्रेनकडून जवळपास सत्तर टक्के सूर्यफूल तेलाची आयात करतो. मात्र युद्धामुळे निर्यात बंद असल्याने त्याचा परिमाण हा तेल पुरवठ्यावर झाल्याचे दिसून आले. तसेच काही काळ इंडोनेशियाने देखील पाम तेलाची निर्यात बंद केली होती. परिणामी देशात खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले. मात्र आता खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आल्याचे चित्र आहे.मात्र तेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले .
महागाईचा आलेख वाढताच
खाद्यतेल जरी स्वस्त झाले असले तरी देखील इतर वस्तुंचे दर सातत्याने वाढतच आहेत, त्यामुळे नागरिक वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात देखील मोठी वाढ झाली आहे. वाहतूक खर्च वाढल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. सीएनजी, पीएनजी सोबतच घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर सुद्धा वाढतच आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराने एक हजारांचा टप्पा पार केला आहे.