दसरा मेळाव्याआधी ठाकरे गटाकडून मोठी बातमी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुंबईत दसरा मेळावा असतानाच शिवसेनेचे पदाधिकारी धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगाकडे बाजू मांडणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.
धनुष्यबाण चिन्हासाठी शिवसेना आज निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करणार आहे. राज्यात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत असतानाच दुसरीकडे शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगासमोर स्पष्ट करावी लागणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे.
त्यानुसार शिवसेनेचे काही निवडक पदाधिकारी सर्व कागदपत्रे घेऊन दिल्लीत दाखल झाले असून आयोगापुढे बाजू मांडण्यात येणार आहे. कोणते मुद्दे मांडायचे, नेमकी भूमिका काय असावी यासाठी हे पदाधिकारी सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, कालच निडणूक आयोगाकडून शिवसेनेला अल्टीमेटम देण्यात आला आहेत. धनुष्यबाणाबाबत ७ ऑक्टोबरला निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ७ ऑक्टोबरपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दिलीय. शिवसेना चिन्हाबाबत ठाकरे गट कोणती कागदपत्रे सोपवणार आणि काय निकाल लागणार याची मोठी उत्सकता आहे.
एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. शिंदे यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षात न जाता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत थेट शिवसेनेवर दावा सांगितला. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची, हा प्रश्न सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच राजकीय पक्षाच्या विषय असल्याने निवडणूक आयोगाचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे न्यायालयासह निवडणूक आयोग काय निर्णय देणार, याबाबत आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा