मोठी बातमी : मांसाहारी घटक वापरल्याच्या आरोपावरून पतजंलीच्या दिव्य दंतमंजनला कायदेशीर नोटीस
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पतंजलीच्या दिव्य दंतमंजनमध्ये मांसाहारी घटक वापरला गेला आहे. मात्र त्यावर शाकाहारी लेबल लावण्यात आलं आहे, असा आरोप करत दिल्लीतील एका लिगल फर्मने पतंजलीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ऍड.शाशा जैन यानी ही नोटीस धाडली आहे.
दिव्य दंतमंजनमध्ये मांसाहरी घटक वापरला जातो. पण त्यावर शाकाहारी असे लेबल लावले जाते. ही ग्राहकांची फसवणूक आहे. लेबलिंग नियमांचेही उल्लंघन होत आहे, असा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे. या नोटीससोबत सर्व कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. माझ्या कुटुंबातील काही सदस्य आणि ओळखीतले लोक दिव्य दंतमंजन वापरतात. पण त्यात मांसाहार असल्याचे कळाले. त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. पतंजलीने याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. परिणामी दिव्य दंतमंजनवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल जैन यांनी केला आहे.
या नोटीसचे १५ दिवसांत उत्तर मिळाले नाही तर त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरु केली जाईल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पतंजली ग्रुपच्या बीपीग्रीट, मधुग्रीट, थायरोग्रीट, लिपिडोम टॅबलेट, आयग्रीट गोल्ड टॅबलेट या पाच औषधांच्या उत्पादनावर आता बंदी घालण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, ग्लुकोमा, हाय कोलेस्टरॉल या समस्यांवर ही औषधे असल्याचा दावा करण्यात येत आहे. या औषधांविरोधात केरळमधील डॉक्टर के. व्ही. बाबू यांनी तक्रार केली होती.
पतंजलीची उत्पादने नैसर्गिक असल्याचे बाबा रामदेव यांनी जाहिरातींमधून सांगितले जाते. उत्तराखंड राज्यातील हरिद्वारमध्ये पतंजलीच्या सर्व उत्पादनांची निर्मिती होते. पतंजलीची विविध उत्पादने देशभरात उपलब्ध असून ती वापरलीही जातात.