मोठी बातमी! LPG सिलेंडर
100 रुपयांनी झाला स्वस्त
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारतीय तेल कंपन्यांनी 1 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमती अपडेट केल्या आहेत. एलपीजी सिलेंडरच्या किंमतींत बदल करण्यात आला आहे. यावेळी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinders) दरांत 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. या बदलामुळे देशाची राजधानी नवी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 1680 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी करण्यात आलेल्या वाढीसह व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1780 रुपयांवर पोहोचली होती.
घरगुती गॅसच्या किमती ‘जैसे थे’
मार्चपासून घरगुती गॅसच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये 14.2 किलो घरगुती एलपीजीच्या किमतींत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. देशाच्या राजधानीत घरगुती गॅसची किंमत 1103 रुपये प्रति सिलेंडर आहे. तर मुंबईत LPG 1102.50 रुपये, कोलकात्यात 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.
LPG व्यावसायिक सिलेंडरची किंमत कोणत्या शहरात किती?
कोलकातामध्ये, LPG 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 93 रुपयांनी कमी झाली असून त्यानंतर आता व्यावसायिक सिलेंडर 1802.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत हा सिलेंडर आता 1640.50 रुपयांना विकला जाईल, जो 4 जुलैला वाढून 1733.50 रुपये प्रति सिलेंडर झाला होता. तसेच, चेन्नईमध्ये एलपीजी 19 किलो सिलेंडरची किंमत 1852.50 रुपयांवर पोहोचली आहे, जी 4 जुलै रोजी 1945 रुपयांपर्यंत वाढली होती.
सीएनजी आणि पीएनजीच्या दरांतही बदल नाही
केवळ घरगुती गॅसच्या किमतीतच नाही तर काही महिन्यांपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बराच काळ बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीसह इतर सर्वच महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कधी वाढल्या होत्या?
सरकारनं 2023 वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये बऱ्याचदा बदल केले आहेत. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींत 83 रुपयांनी कपात करण्यात आली होती. तसेच, मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत घट झाली आणि एका सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर पोहोचली. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2028 रुपये होती. मार्चमध्ये त्याची किंमत सर्वाधिक 2119.50 रुपये होती. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769 रुपये होती. तर जुलैमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा दर सात रुपयांनी वाढवला होता. व्यावसायिक सिलेंडरची किरकोळ किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 इतकी झाली होती.