मोठी बातमी ; शरद पवार राजीनामा मागे घेणार?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेवून आणि बाहेरून आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन येत्या १ ते २ दिवसांत आपण अंतिम भूमिका घेऊ, पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित करणार नाही. पुढील २ दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही, अशी ग्वाही देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी आपला पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिले आहेत. पवार यांच्या या ग्वाहीचे कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले, मात्र पवार यांची धक्कातंत्राची शैली पाहता ते नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता कायम आहे.
एक मोठी बातमी समोर येत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपला राजीनामा मागे घेणार आहेत. ‘लोक माझ्या सांगाती’ या राजकीय आत्मवृत्ताच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बोलताना शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी हबकले आहेत. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून सर्वांची मनधरणी सुरू आहे. साहेबांनी राजीनाम्याच्या निर्णयापासून परावृत्त व्हावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या केंद्राबाहेर बसले आहेत. शरद पवार यांनी गुरुवारी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
राजीनामा देण्याआधी मी तुमच्याशी चर्चा केली असती तर मला खात्री होती की तुम्ही मला होय म्हणाले नसता. हा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राज्याबाहेरील लोकांबरोबर उद्या बैठक होईल. त्यानंतर १ ते २ दिवसांत अंतिम निर्णय सांगू. २ दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही, असा शब्द पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. असा निर्णय घेण्याआधी सहकार्यांशी चर्चा करणे आवश्यक असते. तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची आवश्यकता होती, पण त्यावेळी मी तुम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामागे माझा हेतू काय होता हे मी तुम्हाला सांगितले आहे, असेही पवार म्हणाले. पक्षातील लोकांच्या तीव्र भावना मला दिसत असून मी हा निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी, नवे नेतृत्व तयार व्हावे यासाठीच घेतल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पवार यांनी दिलेल्या स्पष्टोक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले २ दिवस निर्माण झालेली अस्थिरता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
पक्षाला नवा कार्याध्यक्ष मिळण्याची शक्यता
शरद पवार यांनी पदत्याग करण्याची घोषणा करताना पक्षाचा नवा अध्यक्ष नेमण्यासाठी समिती जाहीर केली होती. या समितीची आज शुक्रवारी बैठक होणार असून या बैठकीत पक्षाध्यक्षपद शरद पवार यांच्याकडेच ठेवून पक्षाला नवा कार्याध्यक्ष देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. कार्याध्यक्ष देऊन सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कार्याध्यक्षपदासाठी पवार कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीच्या नावावर चर्चा होऊ शकते. तसा प्रस्ताव मान्य झाला नाही तर कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे येऊ शकते, तर राज्य संघटनेत अजित पवार यांना आणखी मुक्त वाव देऊन पक्षातील वादावर तोडगा काढला जाऊ शकतो. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती केली आहे. भाजपविरोधी आघाडीत शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीला फार काळ शिल्लक नसल्याने शरद पवार यांनी पक्षकार्यात कार्यरत राहावे, अशी इच्छादेखील या दोघांनी व्यक्त केल्याचे समजते.