मोठा दिलासा! खाद्य तेल दरात कपात
मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। GST कर स्लॅबमधील बदलांमुळे आज अनेक जीवनावश्यक पॅकिंग वस्तूच्या किमती वाढल्या आहे. यात पीठ, दही, पनीर यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे महागाईनं त्रस्त नागरिकांना मोठा झटका बसला आहे. मात्र आता दिलासादायक बातमीही समोर येत आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय अदानी विल्मर कंपनीने घेतला आहे.
अदानी विल्मारने सोमवारी खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर ३० रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहेत. कंपनी फॉर्च्युन ब्रँड नावाने आपली उत्पादने विकते. सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. नवीन किमतीसह माल लवकरच बाजारात येणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
याआधी धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रान ऑइलच्या किमतीत १४ रुपयांनी कपात केली होती. खाद्यतेलाच्या किमतींवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालयाने ६ जुलै रोजी एक बैठक बोलावली होती. ज्यामध्ये सर्व खाद्य तेल कंपन्यांना जागतिक किमतीतील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सोयाबीन तेलाचे दर १६५ रुपयांवर
फॉर्च्युन सोयाबीन तेलाची किंमत १९५ रुपये प्रति लिटरवरून १६५ रुपये प्रति लीटर झाली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत २१० रुपये प्रति लीटरवरून १९९ रुपये प्रति लीटर झाली आहे. मोहरीच्या तेलाची कमाल किरकोळ किंमत १९५ रुपये प्रति लिटरवरून १९० रुपये प्रति लीटर इतकी कमी करण्यात आली आहे. फॉर्च्युन राईस ब्रान ऑइलची किंमत २२५ रुपये प्रति लीटरवरून २१० रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे.