आताची बातमी : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ पत्नी मंदाकिनी खडसे यांना मोठा दिलासा, नियमित जामीन मंजूर
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस नेते आ. एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना ₹ मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना २०१६ च्या कथित पुण्यातील भोसरी येथील भूखंड व्यवहार प्रकरणात नियमित जामीन मंजूर केला आहे. एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ मंदाकिनी यांना २ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. खडसे दाम्पत्याला हा मोठा दिलासा मानला जात आहे.
न्यायालायने मंदाकिनी खडसे यांना विनापरवानगी देश सोडू नये असे आदेश दिले आहेत. याशिवाय न्यायालयाकडून त्यांना जेव्हाही बोलावले जाईल, तेव्हा त्यांना तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागणार आहे आणि पुराव्यांशी छेडछाड करू नका असे न्यायालयाने सुनावले आहे.तसेच तपासात सहकार्य करीत नसल्याच्या, ईडीनं केलेला दावा कोर्टानं फेटाळला आहे. २८ ऑगस्ट २०१९ ला दाखल गुन्ह्याच्या आधारावर ३ सप्टेंबर २०२१ ला ईडीनं ECIR दाखल केला होता. ईडीचा दावा फेटाळताना कोर्टाने तपास यंत्रणांवर कडक ताशेरे ओढले आहेत. गुन्हा दाखल होऊन २ वर्ष झाल्यानंतर मग तपासात सहकार्य करत नसेल तर अटक का नाही केली? या केसचा अद्याप फायनल रिपोर्ट दाखल का नाही केला? असे प्रश्न जामीन अर्ज मंजूर आदेशात कोर्टाने विचारले आहेत. खडसे पती पत्नींना अंतरीम जामीन होता. या आदेशानं कोर्टानं तो नियमित केला आहे. खडसे दाम्पत्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. अर्थात, दोघांनाही सशर्त जामीन मंजूर झाले आहेत. आपला राहिवास पत्ता आणि मोबाईल नंबर ईडीसह कोर्टात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात कुठेही जायला प्रतिबंध नाही. मात्र, परदेशी जाण्यासाठी कोर्ट परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप २०१६ मध्ये झाला होता. कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश झोटींग समितीची नियुक्ती केली होती. त्यानंतर हे प्रकरण मागे पडले होते. मात्र, आता पुन्हा हे प्रकरण पुढे आल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते.