ठाकरेंच्या शिवसेनेला हरवण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तिन्ही बाजूंनी घेरण्याची व्यूहरचना आखली जातेय शिवसेनेविरोधात भाजप , शिंदे गट आणि मनसेचं तिहेरी आव्हान उभं केलं जाणाराय. एकीकडं मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या हक्काची मराठी मतं फोडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गट आणि मनसेची युती जुळवून आणली जातेय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी श्रीगणेशाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये गप्पाही रंगल्या. तर राज ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं युती सरकार सत्तेवर आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा होती . मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली जहाल हिंदुत्वाची भूमिका भाजपच्या विचारधारेशी जुळणारी आहे. मात्र, मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतांचा फटका भाजपला बसू शकतो त्यामुळं तूर्तास शिंदे गट आणि मनसेची मनं जुळवून आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप मित्रपक्ष असा थेट सामना झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेविरोधात शिंदे गट आणि मनसेची युती घडवून आणल्यास मराठी मतांचं विभाजन होऊ शकतं. राज ठाकरेंसारखा आक्रमक चेहरा सोबतीला घेतला तर त्याचा फायदा होऊ शकतो, अशी कुजबूज शिंदे गटात आहे.
गेल्या 3 दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. शिवसेनेला आणि ठाकरेंना हरवायचं असेल तर तेवढाच तगडा पर्याय उभा करावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधीच ठाकरेंची शिवसेना खिळखिळी केलीय. आता राज ठाकरेंच्या रूपानं शिवसेनेच्या वर्मावर मोठा घाव घालण्याचा मास्टर प्लॅन भाजपनं आखलाय.