भाजपचे मिशन ४५ प्लस, सात आमदारांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार, हे सात आमदार कोण?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. २०२४ च्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुका होतील असे सांगितले जाते तर एप्रिल मे मध्ये निवडणुका होतील असेही म्हटले जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपनेही लोकसभा निवडणुकीत हमखास विजय मिळवण्याचा प्लान तयार केला आहे. या प्लाननुसार भाजप चक्क लोकप्रिय आमदारांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे यावेळची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्ष्यवेधी ठरणार असल्याचं चित्र आहे.
भाजपचं मिशन ४५ प्लस सुरू झालं आहे. लोकसभेत भाजपच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विद्यमान खासदारांना तिकीट देतानाच राज्यातील सहा ते सात आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासाठी राज्यातील सहा ते सात लोकप्रिय आमदारांची यादी तयार करण्यात आली असून या आमदारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज्यातील महत्त्वाचे आणि लोकप्रिय आमदार आता लोकसभेत दिसण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.
हे सात लोकप्रिय आमदार कोण?
भाजपचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आमदार आकाश फुंडकर, रवींद्र चव्हाण, संजय केळकर आणि राम सातपुते यांना लोकसभेचं तिकीट देण्यात येणार आहे. तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भाजप लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे सातही आमदार लोकसभेच्या मैदानात उतरल्यास अत्यंत चुरशीची निवडणूक होणार असल्याचंही स्पष्ट होत आहे.
या वेळी भाजपने लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार देण्यावर भर दिला आहे. प्रत्येक सीट कशी जिंकता येईल यावर भाजपचा सर्वाधिक भर आहे. एकही सीट हारता कामा नये यावर भाजपचा कल आहे. त्यामुळेच आमदाराची लोकप्रियता, उमेदवाराची आर्थिक सक्षमता, मतदारसंघातील जातीय समीकरणं आदी गोष्टी विचारात घेऊनच उमेदवारांना तिकीट देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय काही सेलिब्रिटी, इतर क्षेत्रातील नामवंत हे सुद्धा भाजपमध्ये येणार का? यावरही भाजपचा भर असल्याचं सांगितलं जात आहे.
ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपला वारंवार पराभव पत्करावा लागला, ज्या मतदारसंघात भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली अशा मतदारसंघांची वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच या मतदारसंघांवर अधिक फोर्स करण्यात येत असल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं.