भाजपचा भगवा भेसळयुक्त ; संजय राऊतांची भाजपवर टीका
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भाजप रंग हा नकली आहे. भाजपच्या भगवा भेसळयुक्त आहे. त्यांनी शुद्ध रंग वापरा. रेड किंवा इतर रंग असतील, तुमच्या भेसळयुक्त रंगाना आम्ही घाबरत नाही. होळी वर्षातून एकदाच येते, पण यांचा शिमगा रोज सुरू आहे. आम्ही जर रोज शिमगा सुरू केला तर महाराष्ट्रात सुद्धा खूप खड्डे खणलेले आहेत. त्या खड्यात कोण पडले आणि कोणाला ढकले जाईल, हे तुम्हाला हळूहळू समजले, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
येत्या काळात ते भाजपला येऊ देणार नाहीत. कोणीही घाबरायची गरज नाही, असे काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देत राऊत म्हणाले की, ‘कोणीही घाबरत नाही, एक लक्षात घ्या. जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल की, केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीच्या आमदार, खासदार, नेते यांचे मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे. असे होणार नाही. आपण पाहताय, आम्ही किती मजबूतीने उभे आहोत. शरद पवारांनी जे सांगितले आहे, जो विश्वास दिलेला आहे की, घाबरू नका, मी पुन्हा भारतीय जनता पक्षाला येऊ देणार नाही. हे त्याचे विधान आणि भूमिका ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही, तर महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने त्यांनी ही भूमिका मांडली आहे. मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून त्यांनी तरुणांसमोर भूमिका मांडली आहे. कारण आमचे भाजपातले मित्र रोज ज्या तारखा देतायत, रंग उधळतायत, ते नकली रंग आहेत. अशा नकली रंगावर केंद्र सरकारची बंदी आहे. त्यामुळे त्यांना शरद पवारांनी उत्तर दिले आहे. काही झाले तरी पुन्हा भाजप येणार नाही. राजकारणात प्रयत्न करण्यासाठी काही हरकत नाही. लोकशाहीत प्रयत्न करत राहिले पाहिजे.’
‘राजकारणात पाठीमागून केलेले वार आम्ही पचवतो’
पुढे राऊत म्हणाले की, ‘शिवसेना हा मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे आव्हान आहे. ज्याचे आव्हान आहे, त्याच्या विरोधात बोंब मारली जाते आहे. भाजपला त्यांच्या दंडात ताकद आहे, असे वाटते पण तसे नाहीये. कारण ते समोरून वार करत नाहीत, पाठीमागून करतात. पण काही हरकत नाही, राजकारणात असे पाठीमागेच हल्ले पचवायचे असतात, ते आम्ही पचवतो आणि उभे आहोत. अडीच वर्ष झाली ना ठाकरे सरकारला. आणि आता अडीच वर्ष अजून जातील. त्यानंतर निवडणुका होतील आणि पुन्हा आम्हीच सत्तेत येणार.’
लवकरच फडणवीसांना गोवा कळेल
२०२४मध्ये भाजपची सत्ता येणार या देवेंद्र फडणवीसांच्या विधानवर राऊत म्हणाले की, ‘गोवा जिंकल्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. गोवा काय आहे ते त्यांना कळेल. गोवा पोर्तुगिजांना देखील कळला नव्हता. गोवा इंग्रजांनाही कळला नव्हता. त्यानंतर अनेक वर्ष राजकीय पक्षानांही कळला नव्हता की, गोवा काय आहे? गोव्याचे राजकारण काय आहे? हे लवकरच फडणवीसांना कळले काही हरकत नाही. गोवा जिंकून आल्यानंतर त्यांचा महाराष्ट्रात आत्मविश्वास वाढला असेल. तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी जिंकावे, त्यांनी प्रयत्न करत राहावे. त्यांनी राजकीय कार्यामध्ये वाहून घ्यावे, व्यस्त राहावे.’