भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ब्रेकिंग : औरंगाबादसह उस्मानाबाद शहराच्या नामांतर विषयी दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. औरंगाबादसह उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. या दोन्ही शहरांच्या नव्या नावांचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला. अखेर केंद्र सरकारने दोन्ही नावांच्या नामांतरासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराला अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव असं म्हटलं जाणार आहे. सर्व शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख केला जाईल.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं, अशी मागणी केलेली. बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबाद शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 8 मे 1988 रोजी सभा झालेली. या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबतची मागणी केलेली. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून ही मागणी लावून धरण्यात आली होती. औरंगाबादमधील प्रत्येक निवडणुकीत नामांतराच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटायचं. अखेर याबाबत निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतलेला. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील नामांतराला मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंडखोरी केली आणि ते 40 आमदारांसह गुवाहाटीला गेले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं. या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकी घेत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराबद्दल निर्णय घेतलेला. त्यानंतर काही दिवसांत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात नव्याने अस्तित्वात आले. त्यावेळी नव्या सरकारच्या झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत नामांतराबद्दलचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. ठाकरे सरकारने राजीनाम्याआधी घाईत निर्णय घेतला. त्यामुळे तांत्रिक अडचणींचे कारण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा त्याबाबतचा निर्णय घेतला.

राज्य सरकारने नामांतराबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दलचा प्रस्ताव केंद्रात पाठवण्यात आलेला. अखेर तो प्रस्ताव केंद्र सरकारकडून देखील मान्य करण्यात आलाय. त्यामुळे औरंगाबाद शहराला आता छत्रपती संभाजीनगर हे नवं नाव मिळालं आहे आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव हे नाव मिळालं आहे.

औरंगाबादच्या नामांतराला अनेकदा विरोध झाला. वेगवेगळे पक्ष आणि संघटनांकडून याबाबत विरोध करण्यात आलेला. या विरोधात आधी काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षही होते. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन्ही पक्षांनी नामांतराला विरोध केला नाही. दुसरीकडे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध केलेला. पण विरोधकांचा सर्व विरोध झुगारुन सरकारने अखेर नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

औरंगाबाद नावाचा नेमका इतिहास आहे तरी काय?मुंबईच्या कान्हेरी गुफांमध्ये एक शिलालेख सापडला होता त्यात औरंगाबादचं नाव ‘राजतडक’ असल्याचं आढळून आले आहे.  हे नाव कुणी ठेवले त्या नावाचा वास्तिविकतेशी काय संबंध यावर अजूनही प्रकाश पडलेला नाही. या शहराचं नावाजलेलं नाव हे खडकी आहे. हा परिसर बेसॉल्ट खडकावर वसलेला आहे. त्यात शहरात अगदी प्राचीन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे, अशी इतिहासात नोंद आहे.

त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता ख-या अर्थानं ‘नहरे ए अंबरी’ सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्यानं या गावाचं शहर केलं. मात्र  त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही.  कालांतरानं 1633 मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव ‘फतेहनगर’ असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्यानं पुन्हा या शहराचं नाव फतेहनगरवरुन ‘खुजिस्ता बुनियाद’ असे ठेवले.  कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं.  ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.

काळाच्या ओघात औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी झाली. अजिंठा आणि वेरुळ सारख्या वास्तूंमुळे अगदी जगाच्या कानाकोप-यात औरंगाबादचं नाव दुमदुमलं. मात्र हेच नाव आता बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या. नाव बदलण्यामागं राजकारण हे एकमेव कारण असल्याच अभ्यासक  सांगतात.  हा  प्राचीन काळापासून हा ट्रेन्ड सुरु असल्याचे दाखले ते देतात.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!