ब्रेकिंग : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर, रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातली एक मोठी बातमी समोर आली आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. तर आता रमेश बैस (Ramesh Bais) हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत औरंगाबादमधील कार्यक्रमात कोश्यारी यांनी वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानाला कडाडून विरोध झाला. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यांच्या या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चाही काढला होता. तसंच कोश्यारी यांनीही काही दिवसांआधी आपल्याला पदमुक्त करण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे, आता रमेश बैस (Ramesh Bais) हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करण्यात आले आहे.
राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांची यादी
लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
सीपी राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड
शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम
निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
विश्वभूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगड
अनुसुईया उईके, राज्यपाल, मणिपूर
एल गणेशन, राज्यपाल, नागालँड
फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
ब्रिगेडियर (निवृत्त) बीडी मिश्रा, लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख