ब्रेकिंग : शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचे आकस्मिक निधन
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मिक निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला. त्यांनी सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या पादाक्रांत केल्या. जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. गेल्यावर्षी झालेल्या राजकीय उलथापालथीत ते अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिंदे गटात ते सहभागी झाले.
पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळाचा शाप आहे. या भागासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले.