बारावीची परीक्षा देणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना बोर्डाकडून चौकशीसाठी बोलावणं, का बरं बोलावलं असेल? त्यांनी असं केलयं तरी काय?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। या वर्षी बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका आढळल्या होत्या. तसेंच बारावीची परिक्षा सुरु असताना पेपर फुटीचा प्रकारही उघडकीस आला होता. आता निकालाची वेळ जवळ आली तरी बारावीच्या परीक्षेसंदर्भातील घोळ कायमच आहे. ती म्हणजेच संभाजीनगर बोर्डाने बारावीच्या जवळपास ३०० वर विद्यार्थ्यांना बोर्डात चौकशी साठी बोलावले आहे. त्या मुळे मोठी खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत शिक्षकांना अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत. चौकशीसाठी बोलावण्यात आलेले बहुतांश विद्यार्थी अंबेजोगाईचे आहेत. फिजिक्सच्या पेपर मध्ये विद्यार्थ्यांच्या अक्षर विरहित दुसरे अक्षर आढळले आहे. काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पेपर तपासताना शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना बोर्डाने चौकशी साठी बोलावलं आहे.
तर दुसरीकडे विद्यार्थी मात्र आम्ही पेपर मध्ये काहीही चुकीचं लिहल नाही, बदल असलेले अक्षर आमचे नाही, त्यामुळं आम्हाला त्रास नको अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळं नक्की या सगळ्या पेपर्स मध्ये कुणी अक्षर बदल केला असा प्रश्न विद्यार्थी आणि बोर्डाला पडला आहे. या सगळ्या मुलांचे आता निकाल उशिराने लागण्याची शक्यता आहे.. पालक आणि विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर, बोर्डाने मात्र या सगळ्या प्रकाराची चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे. जर विद्यार्थ्यांनी लिहिलं नाही तर ह्या पेपरमध्ये नक्की कोणी लिहिलं याही प्रकरणाची शहानिशा केली जाईल असं बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले.
परिक्षेवेळी बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका आढळून आल्या होत्या. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत कवितेवर आधारीत तीन प्रश्न चुकीचे छापण्यात आले होते. मात्र, चुकीचा प्रश्न सोडवणा-या सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण सहा गुण देण्याचा निर्णय बोर्डाने जाहीर केला. एखादा प्रश्न चुकला जरी असेल तरी विद्यार्थ्याने फक्त त्या प्रश्नाचा क्रमांक लिहिण्याची अपेक्षा असते. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी चुकीच्या प्रश्नाचा क्रमांक लिहिला नसेल किंवा तो भाग सोडून दिला असेल तर हे सहा गुण मिळणार नाहीत. मात्र सरसकट सर्वांनाच गुण देण्याची मागणी विद्यार्थी तसंच पालकांनी केली होती.तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातून बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. साखरखेर्डा पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली होती यात दोन शिक्षकांचा समावेश होता. या पेपर फुटीचे पडसाद विधीमंडळातही उमटले होते. यानंतर याप्रकरणी SIT मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले.