लाखो महाराष्ट्रवासीयांचे कुलदैवत “खंडोबा”… …म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मार्गशीर्ष महिन्याला व्रत वैकल्यांचा महिना मानले जाते. हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे. या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते. याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते. यंदा आज २९ नोव्हेंबर मंगळवार रोजी चंपाषष्ठी आहे. चंपाषष्ठीचे नेमके महत्त्व काय अन् हा दिवस कसा साजरा केला जाता याबद्दल आपण जाणून घेऊया.
नवरात्रीप्रमाणे खंडेरायाचा षड्ररात्रोत्सव
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाचष्ठी असे म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षड्ररात्रोत्सव सुरु होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी. मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले तो हा दिवस. म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा षड्ररात्रोत्सव हा उत्सव करतात. खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासीयांच कुलदैवत
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे उत्सवात साजरे करण्याचे नवरात्रीप्रमाणे व्रत असते. जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासीयांच कुलदैवत आहे. घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो. घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुघट व देवांचे टाक त्यांची पूजा केली जाते. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात. या षड्ररात्रोत्सवादरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो.
असे करावे चंपाषष्ठी व्रत
या दिवशी घटस्थापना करुन नंदादीप प्रज्वलन केले जाते. यासह या सहा दिवसांच्या काळात मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्म्य याचा पाठ केला जातो. नवरात्रीप्रमाणे याही उत्सवात उपवास करुन एकाच वेळी जेवण केले जाते. याला एकभुक्त व्रत असे म्हणतात. खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार आहे त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. आपल्या घरी अन्नदान करावे. याला वाघ्या -मुरळीला भोजन असेही म्हटले जाते. चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत अन् भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण करावा. यासह खंडोबाची तळी भरून आरती करावी.