महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाची शक्यता,नाशिक, जळगाव, विदर्भात पुढचे दोन दिवस थंडी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नाशिक, जळगाव, विदर्भातील काही जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडी राहण्याची शक्यता आहे. परंतु हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा, विदर्भ व परीसरात हलका -मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच २५ तारखेपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मागच्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला थंडीचा कहर काही प्रमाणात कमी आला आहे. परंतु उत्तरेतून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील काही भागात अद्यापही थंडी कमी झालेली नाही.
हीच परिस्थिती देशातील काही भागात राहण्याची शक्यता आहे. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३ जानेवारीपासून पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा कहर होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस आणि डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतर २३ जानेवारीपासून उत्तर भारतात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान आणि शेजारच्या भागात चक्रीवादळाच्या रूपात एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे. २३ तारखेला पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २४ ते २७ जानेवारी दरम्यान दिल्लीत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५-२७ जानेवारी दरम्यान उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच २३ ते २७ जानेवारी दरम्यान, देशाच्या पश्चिमेत झालेल्या गोंधळाची स्थिती हळूहळू पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे. २३ जानेवारीपासून थंडी वाढण्यास सुरुवात होईल आणि २४ जानेवारीपासून आसपासच्या राज्यात त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ही थंडी पुढचे चार दिवस राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान पुढच्या काही दिवसांत ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तर पठारी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. हवामान विभाग दिलेल्या माहितीनुसार, २४ जानेवारीच्या संध्याकाळपासून पावसाची शक्यता आहे. २४ ते २६ जानेवारीच्या सकाळपर्यंत हलका पाऊस पडू शकतो. तसेच पुढच्या पाच दिवसांत हवामानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नसल्याची माहिती आहे.