पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा सूत्रधार चतुर्वेदी देशातून फरार,ईडी व आयकर विभाग चतुर्वेदीच्या मागावर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। श्रीधर पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा सूत्रधार नंदकिशोर चतुर्वेदी फरार झाल्याची माहिती समोर आलीय. नंदकिशोर चतुर्वेदी यांनी देशातून पळ काढल्याची तपास यंत्रणांना माहिती मिळालीय. आयकर विभाग आणि ईडी चतुर्वेदीच्या मागावर आहेत. तसेच कारवाईच्या भीतीनं तो भारत सोडून आफ्रिकन देशात पसार झाल्याचं सांगितलं जातं आहे. गेल्या काही महिन्यांपासून नंदकिशोर चतुर्वेदी हा देश आणि मुंबई सोडून आफ्रिकेच्या एका देशात राहत आहे.
ईडीनं केलेल्या कारवाईनंतर नंदकिशोर चतुर्वेदी हा रडारवर आला. मागील 9 महिन्यांपासून आयटी आणि ईडी नंदकिशोर चतुर्वेदीच्या मागावर होते. या व्यक्तीच्या नावावर अनेक शेल कंपन्या आहेत. शेल कंपन्यांमार्फत हवाला पैसा जमा करण्याचं काम याच्याकडेच आहे. विशेष म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी हा पेशानं सीए आहे. नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर्स असून, त्याचे ठाकरे परिवाराशी अत्यंत जवळचे संबंध असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. चतुर्वेदीची ईडी आणि आयटीकडून चौकशी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो देश सोडून गेल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे परिवाराचा फ्रँटमॅन असल्याचा भाजपकडून सातत्याने आरोप केला जातोय.
विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्यांनीही नंदकिशोर चतुर्वेदीवर गंभीर आरोप केलेत. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी 2014 मध्ये जी कोमास प्रॉपर्टीज कंपनी बनवली होती. त्यामध्ये आदित्य ठाकरे डिलर आणि मालकही होते. कंपनीतील 50 टक्के भागीदारी आदित्य ठाकरे आणि 50 टक्के भागीदारी रश्मी ठाकरे यांची होती. या कंपनीची आता काय अवस्था आहे? ही कंपनी आता नंदकिशोर चतुर्वेदीची झाली आहे. हा हवाला ऑपरेटर असून, 30 कोटींच्या व्यवहारात त्यांचा समावेश आहे. ठाकरे कुटुंबीयांनी जी कंपनी बनवली होती, ती नंदकिशोर चतुर्वेदी का दिली?’, असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केलाय.
दुसरीकडे श्रीधर पाटणकर प्रकरणातही नंदकिशोर चतुर्वेदीचं नाव पुढे येत आहे. महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदींमार्फत आपल्या पुष्पक समूहातील पुष्पक रिअॅलिटी या कंपनीचा निधी वळवल्याचंही सांगितलं जातंय. पुष्पक रिअलिटीने एका व्यवहारासाठी विविध स्तरांचा वापर करून 20.02 कोटी रुपयांचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडे वळवला. नंदकिशोर चतुर्वेदी हे अनेक शेल कंपन्या चालवतात. त्यांच्या कंपन्यांपैकी एक कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडमार्फत व्यवहार करण्यात आले.
यामार्फत श्रीसाईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडला 30 कोटींचे कर्ज कुठलेही तारण न ठेवता देण्यात आले. म्हणजेच महेश पटेल यांचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत श्रीसाईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवण्यात आले. साईबाबा गृहनिर्मिती कंपनी ही रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांही ईडीनं जप्त केल्यात.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा