मुख्यमंत्री शिंदे अपात्र होणारच नाहीत. ते अपात्र झाले….देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी २७ ऑक्टोबर भाजप महाराष्ट्रने फडणवीसांचा मी पुन्हा येईनचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर राजकीय गोंधळ उडाला. राज्यच्या राजकारणात मोठा राजकीय भूकम्प होतो की काय आशा चर्चाना उत आला, त्यानंतर त्याचा खुलासा आज फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांच्या अपात्रतेबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाची आता राज्यभर चर्चा होत आहे.
मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री आणि माझा संवाद चांगला आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक काही लोकांनी व्हिडीओ टाकून खेळ करण्याचा प्रयत्न केला. इशारा हा व्हिडिओच्या माध्यमातून दिला जात नाही. सरकार व्यवस्थित चालले आहे. अनेक आव्हाने आहेत. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे इशारा देण्याचा प्रश्नच येत नाही. सरकारमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री अपात्र झाले तरी..
मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे अपात्र होणारच नाहीत. ते झाले तरी देखील विधान परिषदेवर येऊ शकतात. पण आम्ही कायद्याने सर्व काही केले आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही. उद्धव ठाकरे हे उर्वरित पक्ष वाचवण्यासाठी ते लोकांना आशा दाखवत आहेत. हे सरकार पूर्णवेळ चालणार आहे. बी प्लानची गरज नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असेसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी ठणकाहून सांगितले.
अजित पवार आमच्यासोबत पूर्ण ताकदीने आहेत. आमचं सरकार स्थिर होतंच परंतू राजकारणात शक्ती वाढवावी लागते. त्यामुळे राष्ट्रवादीला आमच्यासोबत घेतले. ते २०१९ ला ही येणार होते. तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. त्यांना आधीच सांगितलं होतं की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. अजित हे परिपूर्ण राजकारणी आहेत त्यांनी ते मान्य केलं आणि सत्तेत आले असे सुद्धा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.