भीक मागणाऱ्या विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामूहिक अत्याचार, तर इतर दोघांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली.
सातारा शहरामध्ये भीक मागत असलेली 25 वर्षीय महिला 23 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता तिच्या लहान मुलीसमवेत रहिमतपूर रस्त्यावर उभी होती. यावेळी संशयित हे दोन दुचाकीवरून तिथं आले. ‘तुला व तुझ्या मुलीला घरी सोडतो,’ असं म्हणून दोघींना दुचाकीवर बसविलं. त्यानंतर ते दुचाकीवरून घरी निघाले. मात्र, जैतापूर गावच्या हद्दीतील पुलाजवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबविली.
पीडित महिलेला ओढत रस्त्याच्याकडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली नेलं. इथं नम्या भोसले आणि मयूर काळे या दोघांनी त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केला. तर, किरडेट पवार आणि भगत काळे यांनी त्या महिलेसोबत अश्लील कृत्य केलंय. तसंच हा प्रकार कोणाला सांगितलास तर जीवे ठार मारेन, अशी तिला धमकी दिली. यानंतर पीडित महिलेनं घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून घेत रविवारी रात्री या प्रकरणी नम्या यंत्र्या भोसले (रा. फडतरवाडी, ता. सातारा), किरडेट आशिर्वाद पवार (रा. गोगावलेवाडी, ता. सातारा), भगत काप्या काळे (रा. बारटक्के चौक, सातारा), मयूर नागेश काळे (रा. फडतरवाडी, ता. सातारा)या चारही संशयितांना अटक केलीय.