भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

महावितरणचा ग्राहकांना बसणार वीज दरवाढीचा शॉक

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मागील काही महिन्यांपासून सातत्याने सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. अशातच आता नव्या आर्थिक वर्षात नागरिकांना वीज दर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण महावितरण’ कंपनीने आगामी वीजदर आढाव्यात तब्बल ३७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. तर पुढील दोन वर्षासाठी सरासरी ही दरवाढ ३७ टक्के प्रस्तावित आहे.

महावितरण कंपनीच्या या प्रस्तावामुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच श्रेणींना दरवाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येत्या नवीन आर्थिक वर्षांपासून दरवाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. महावितरण कंपन्यांचे ग्राहकांसाठीचे वीजदर पंचवार्षिक असतात. त्यानंतर या दरांचा मध्यकालीन आढावा घेतला जातो. सध्याचे महावितरणचे दर हे एक एप्रिल २०२० पासून लागू झाले आहेत. त्यानुसार त्यांचा आता मध्यकालीन आढावा घेतला जात आहे. तसेच, विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यास या वर्षी एक एप्रिलपासून नवीन दर लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महावितरण कंपनीच्या नवीन दरांनुसार, घरगुती ग्राहकांचा सध्या असलेला किमान दर ३.३६ रुपये प्रति युनिटवरून २०२३-२४ साठी (एक एप्रिलपासून) ४.५० रुपये प्रतियुनिट होऊ शकतात. तर सध्याचा ११.८६ रुपये प्रतियुनिट हा कमाल दर आता १६.६० रुपये प्रति युनिट प्रस्तावित आहे. या दोन्ही श्रेणींमधील सन २०२४-२५ साठीचा वीजदर अनुक्रमे ५.१० रुपये ते १८.७० रुपये प्रति युनिट प्रस्तावित आहे. व्यवसायिक श्रेणीत सध्या किमान ७.०७ रुपये ते ९.६० रुपये प्रतियुनिटचा असलेला दर आता १२.७६ रुपये ते १७.४० रुपये प्रति युनिट इतका प्रस्तवित आहे. त्यापुढील वर्षासाठी हा दर किमान ११ रुपये ते कमाल २० रुपये प्रति युनिट इतका प्रस्तावित आहे.

लघुदाब औद्योगिक श्रेणीतील हा दर आता ५.११ रुपये ते ६.०५ रुपये प्रति युनिटवरून ६.९० ते ८.२० रुपये प्रति युनिट प्रस्तावित आहे. उच्चदाब औद्योगिक श्रेणीतील ग्राहकांना आता सध्याच्या ६.८९ रुपये प्रतियुनिटवरून ९.३२ व त्यानंतरच्या वर्षी१०.५० रुपये प्रति युनिट इतका असेल. लघु दाब श्रेणीतील शेतकऱ्यांसाठीचे दर देखील किमान १.९५ रुपये ते कमाल ३.२९ रुपये प्रति युनिट वरून २.७० रुपये ते ४.५० रुपये प्रति युनिट करण्याबाबत नमूद आहे. मात्र वीज दर वाढीचा महावितरणने फक्त प्रस्ताव दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!