CORONA : कोरोनाचा नवा व्हेरिएंट देशांतील ११ राज्यात , तज्ज्ञांचा इशारा
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आता पुन्हा देशात कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासांत या विषाणूचे ३०१६ नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णांचाही मृत्यू होत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोविडमुळे देशांतील काही राज्यांत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन सब-व्हेरियंटमुळे प्रकरणे वाढत आहेत. Omicron XBB.1.16 प्रकार वेगाने पसरत आहे आणि लोकांना संक्रमित करत आहे. हा प्रकार इम्युनिटी (immunity) अर्थात रोग प्रतिकारशक्तीला चकवत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील ११ राज्यांमध्ये XBB.1.16 प्रकाराची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या प्रकारातील प्रकरणांची संख्या ६०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये XBB प्रकारांची अधिक प्रकरणे येत आहेत. या प्रकारामुळे मृत्यूही होत आहेत. या प्रकाराची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीनोम सिक्वेंन्सिंग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
आता सावध राहण्याची गरज
वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे हा नवा व्हेरिअंटही असू शकतो. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे त्यांना त्याचा संसर्ग होत आहे. कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे उत्तम चाचणी हेही आहे. लोक फ्लूच्या लक्षणांसह रुग्णालयात जात आहेत, जिथे त्यांची कोविड चाचणी देखील केली जात आहे. चाचण्यांमध्ये लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे आणि रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविडच्या प्रकरणांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. लोकांना मास्क घालण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचा तसचे सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
श्वसनाचा त्रास असेल तर निष्काळजीपणा नको
श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांनी यावेळी सतर्क राहावे, असे डॉक्टरांनी नमूद केले. कोविडच्या नवीन प्रकारामुळे काही समस्या वाढू शकतात. त्यामुळे श्वसनाचा आजार असणाऱ्या लोकांना त्यांच्या आजारासाठी औषध नियमितपणे घेत राहण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, कोणत्याही संक्रमित रुग्णाच्या संपर्कात येणे टाळा. जर कोणाला खोकला-सर्दी किंवा सौम्य ताप असेल तर त्याच्यापासून अंतर ठेवा. कोविडची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.