Corona Variant JN.1 : नव्या विषाणूनं टेन्शन वाढवलं, राज्यात एकाच दिवसात तब्बल ९ रुग्ण आढळले
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कोरोनाच्या जेएन.१ या नव्या विषाणूने राज्यात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यात रविवारी जेएन.१ व्हायरसचे ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एक महिलेसह ४ पुरुषांचा समावेश आहे. एकाचवेळी ठाण्यात ५ नवे रुग्ण आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात राज्यात जेएन.१ विषाणूचे तब्बल ९ रुग्ण आढळून आले आहेत. त्या मुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
कोरोना तपासण्या वाढवण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
नव्या बाधित रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत ५, पुणे महापालिका हद्दीत ०२, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी १ रुग्णाची नोंद झाली. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी ८ आठ रुग्णांनी कोविडच्या लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.सध्या या सर्व रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सगळ्यांमध्ये जेएन १ व्हेरिएंटचे तीव्र लक्षणं नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृतीत देखील सुधारणा होत असल्याचं राज्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे देशात कोरोनाच्या नवीन जेएन.१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात हा व्हेरिएंट कोकणात दाखल झाला. आता कोकणानंतर ठाणे आणि पुणे शहरात कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचे रुग्ण मिळाले आहे.