महाराष्ट्रात काउंटडाऊन सुरू…राजकीय उलथापालथ होणार असल्याचा “कोणी” केला मोठा दावा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील एकनाथ शिंदे सरकारच अवैध ठरवणारी याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं काउंटडाउन सुरु झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊन सरकार कोसळणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.
आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे, असा दावा करणारं ट्विट केलंय. येत्या शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार, असं भाकित त्यांनी केलंय. आमदार अमोल मिटकरी यांनी येत्या शिवजयंतीपूर्वी राज्यात स्थित्यंतर येण्याचा दावा केलाय. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात राज्यात मोठी उलथापालथ होणार की काय, अशा चर्चांना उधाण आलंय.
निवडणूक आयोगात सुनावणी
शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावरून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. येत्या ३० जानेवारी रोजी यासंदर्भातील महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आतापर्यंत झालेल्या युक्तिवादानुसार, ठाकरे गटाचं पारडं जड असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या वेळच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. पक्षाची घटना, राष्ट्रीय पक्ष कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा अनेक मुदद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी तसेच मनिंदर सिंग यांनीही युक्तिवाद केला.
तर शिवसेनेच्या १६ आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंबंधी याचिका, राज्यपाल तसेच विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अखोरेखित करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून ही सुनावणी सलग घेतली जाईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या सुनावणीत शिंदे सरकारच्या विरोधी निकाल लागेल आणि राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल, असाच अर्थ या ट्विटचा आहे का, असे तर्क लावले जात आहेत.