Video | ईडीकडून एकनाथ खडसेंची चौकशी पूर्ण ; निवासस्थानी दाखल !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, प्रतिनिधी । राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून अर्थात ईडीकडून तब्बल नऊ तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडताना खडसेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींना कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पण त्यांच्या वकिलांनी माहिती देताना सांगितलं की, खडसेंना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. पण ज्यावेळी बोलावणं येईल त्यावेळी ते प्रत्यक्ष हजर राहतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
खडसेंचे वकील म्हणाले, “भोसरी येथील भूखंड खरेदीप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सर्व माहिती दिली आहे. चौकशीत खडसेंच्या सर्व मिळकतींची माहिती घेण्यात आली. चौकशी दरम्यान जे निवेदन देण्यात आलं होतं ते देखील आम्ही तपासलं आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी जी कादगपत्रं हवी होती ती सर्व देण्यात आलेली आहेत. या चौकशीसाठी आम्ही संपूर्ण सहकार्य दिलं आहे. त्याचबरोबर इतर काही कागदपत्रे ईडीनं दहा दिवसांत जमा करायला सांगितली आहेत.”
त्याचबरोबर यापुढे जेव्हा ईडीकडून चौकशीसाठी बोलावणं येईल तेव्हा खडसे वैयक्तीकरित्या कार्यालयात हजर राहतील असंही ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. तसेच आजच्या चौकशीनंतर खडसेंना ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावलेलं नाही. भोसरी भूखंड खरेदीप्रकरणी झालेल्या व्यवहारांबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या व्यवहारांबाबत खडसेंचा वैयक्तिकरित्या काहीही संबंध नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं, असंही खडसेंच्या वकिलांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं.