स्वस्त होणार खाद्यतेल! तेलाच्या किमतीत घसरण
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। खाद्यतेलाबाबत मोठा बातमी समोर येत आहे. आजच्या होळीच्या दिवशी एक आनंदाची बातमी आली आहे. बाजारात सध्या खाद्यतेलाच्या अनेक बड्या कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दरात घट आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. मोहरी, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविण्यात आली. आता शेतकरी, दुकानदार आणि ग्राहक या सर्वांना याचा फायदा होणार आहे.
बाजारातील सूत्रानुसार, गेल्या हंगामात मोहरीचे तेल १६५ ते १७० रुपये लिटर या किमतीत विकले जात होते, आता ही किंमत कमी होऊन १३५ ते १४० रूपये प्रति लिटरवर आली आहे. मोहरीने गेल्यावर्षीचाच ट्रेंड कायम ठेवल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. मोहरीचे तेल १० टक्के, सोयाबीन तेल ३ टक्क्यांनी एका महिन्यात स्वस्त झाले आहे.
गेल्या वर्षी जून-जुलै महिन्यात परदेशी खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या. त्यामुळे मोहरीच्या तेलाकडे ग्राहकांनी पाठ केली. परिस्थिती अशी झाली की, परदेशातून आयात तेल देशातील तेलापेक्षा स्वस्त झाले. त्यामुळे मोहरीच्या खाद्यतेलाला उठावच नव्हता. कच्च्या पाम तेलाच्या किमती वर्षभरात जवळपास ३० टक्क्यांनी घसरून ९५ रुपये प्रति लिटर आणि आरबीडी पामोलिनच्या किमती जवळपास २५ टक्क्यांनी घसरून १०० रुपये प्रति लिटरवर आल्या आहेत.
देशातंर्गत उत्पादित होणाऱ्या सोयाबीनचीही तशीच परिस्थिती होती. उत्पादन चांगले असूनही परदेशी तेलाने सोयाबीन तेलाचे गणित बिघडवले. स्वस्तात आयात तेलापुढे सोयाबीनचा टिकाव लागला नाही. मागणी घटल्याने सोयाबीन खाद्य तेलाच्या किंमती घसरल्या. रिफाइंड सोयाबीन तेलाचा भाव १४०-१४५ रुपयांवरून ११५-१२० रुपये प्रति लिटर आणि सूर्यफूल तेलाचा दर वर्षभरात १३५-१४० रुपयांवरून ११५-१२० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
देशात तेलबियांचे बंपर उत्पादन अपेक्षित आहे आणि खाद्यतेल परदेशी बाजारपेठेतही स्वस्त आहे. दरम्यान, भारतातील खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारांवर अवलंबून असतात कारण देशात त्यांचा वापर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात केले जाते, असं सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑइल इंडस्ट्री अँड ट्रेडशी संबंधित व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.