खाद्यतेल स्वस्त होणार? महागाई पासून दिलासा मिळणार
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आगामी अर्थसंकल्प आणि लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्रातील मोदी सरकार ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याची शक्यता आहे. मागच्या काही महिन्यांपासून अन्नधान्य, डाळी, भाज्या, मसाले आणि इतर पदार्थ महागल्याने गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. त्यामुळे आता खाद्यतेल स्वस्त करून सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे.
त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयाने खाद्य तेल उत्पादक कंपन्यांना एक पत्र लिहिलं आहे. सॉल्वेंट एक्स्ट्रक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाला जागतिक स्तरावरील किंमतीच्याआधारे खाद्यतेलाच्या भावात कपातीचे निर्देश देण्यात आले आहेत. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावलं उचलत आहे, नवीन वर्ष, होळी आणि लग्नसमारंभात खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशाने, शुल्क सवलत मर्यादा १ वर्षाने वाढवण्यात आली आहे.
यावेळी खाद्यतेलाच्या किंमतीत एकदमच कपात करणं शक्य नाही. पण टप्प्याटप्प्याने हा निर्णय अंमलबजावणीत येईल. मार्च महिन्यापर्यंत खाद्यतेलाच्या किंमतीत कपातीची शक्यता आहे. देशात मोहरीचे उत्पादन आता हाती येईल. त्यानंतर नवीन तेलाचा बाजारात पुरवठा होईल. तोपर्यंत किंमतीत कपात करणं शक्य नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अर्थात याविषयीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी याविषयी दिलेल्या माहिती नुसार, केंद्र सरकारने त्यांना जागतिक बाजारातील किंमतींनुरूप देशातील तेलाच्या किंमतीत कपातीचे पत्र पाठवले आहे. सोयाबीन सूर्यफूल, पॉम ऑईल यांच्या किंमती जागतिक बाजारातील किंमतींनुरूप कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारातील किंमतींनुसार देशातील खाद्यतेलाच्या किंमतीत कोणतीही कपात झाली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यादिशेने पावलं टाकण्याचे निर्देश कंपन्यांना देण्यात आले आहेत.
डिसेंबरमध्ये खाद्यतेलाच्या किमती सुमारे १० टक्के कमी झालेल्या आणि जानेवारीमध्ये किमती पुन्हा ८ टक्के वाढल्या. विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनुसार सरकारने सक्ती केल्यास कंपन्या केवळ ३-४ टक्के किंमती कमी करू शकतील.असे वनस्पती तेल ब्रोकरेज कंपनी सनविन ग्रपुचे सीईओ संदीप बजोरिया म्हणाले.