कोरोना रुग्ण वाढीमुळे शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं…..
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात चौथी लाट येणार की नाही यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच ‘महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे पूर्ण खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील. शाळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल’, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा फोफावत असताना दिसत असून दैनंदिन रुग्णसंख्या हजारांच्या आसपास पोहोचली आहे. ‘कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली असली तरी काळजी घेऊन आणि आरोग्य विभागाच्या सल्ल्यानेच शाळा सुरु केल्या जातील,’ अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्य मंडळाच्या शाळा १३ जून तर केंद्रीय मंडळाच्या शाळा ८ जूनपासून सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील. विद्यार्थ्यांच्या लसीकरणा संदर्भात लसीकरण वाढवण्याबाबत टास्क फोर्सचा सल्ला घेण्यात येईल, असे ही गायकवाड यांनी स्पष्ट केले.