निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का,अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी (Affidavits) सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने बाद ठरवली आहेत. प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकल्यानं निवडणूक आयोगानं ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवली आहेत. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुण्यामध्येच ही प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विहीत नमुण्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर न करण्यात आल्यानं ही प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहेत.
खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यावरून सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद सुरू आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना या नावावर दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगाकडून चिन्हासह शिवसेना हे नाव देखील गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाहीये.
त्यामुळे आता दोन्ही गटाकडून शिवसेना ही आमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सदार करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दोन ट्रकभरून ११ लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते. मात्र यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्र फॉरमॅट चुकल्यानं निवडणूक आयोगाकडून बाद ठरवण्यात आली आहेत. तर उर्वरीत साडेआठ लाख प्रतिज्ञापत्र ही वैध्य आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.