वीज दरवाढीचा ग्राहकांना “शॉक”
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील नागरिकांना नव्या वर्षात वीजदरवाढीचा ’शॉक’ बसणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. महावितरण कंपनीने सरासरी २ रुपये ३५ पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी केली आहे.
गेल्या काही काळात खर्चात वाढ झाल्याने महानिर्मिती कंपनीने सरासरी प्रति युनिट १.०३, तर महापारेषण कंपनीने ३२ पैसे असा एकूण १.३५ रुपये प्रतियुनिट दरवाढीचा प्रस्ताव आधीच सादर केला आहे. वीज ग्राहकांवर अगोदरच प्रतियुनिट १.३० रुपयांचा बोजा पडला होता. गेल्यावर्षीच्या जून महिन्यापासून याची अंमलबजावणी सुरु झाली होती. आता या भाराचा समावेश करून महावितरण कंपनीने सरासरी प्रति युनिट २.३५ रुपये दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे.
संभाव्य दरवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वीज ग्राहकांनी प्रचंड संख्येने सूचना व हरकती नोंदवून करावे, असे आवाहन वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे यांनी यानिमित्ताने केले आहे. महावितरणमधील विविध समस्या सोडवून राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी प्रताप होगाडे यांनी केली.