शिक्षण विभागात खळबळ ; बारावीच्या परीक्षेत मोठा घोटाळा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।बारावी परीक्षेच्या पेपरफुटीमुळे यंदाच्या वर्षीची बारावीची परीक्षा राज्यभरात अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरली. परंतु आता बारावीच्याच परीक्षा संदर्भातील पेपर तपासणीमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे शिक्षण विभागात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
बारावीच्या भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये तब्बल ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेमध्ये दोन हस्ताक्षर आढळून आलेली होती. त्यामुळे या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्यात आली. परंतु या चौकशी समितीच्या अहवालातून आलेल्या माहितीमुळे आता धक्का बसलेला आहे. कारण चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार भौतिकशास्त्राच्या ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याची माहिती उघडकीस आलेली आहे. त्यामुळे आता याबाबत राज्य शिक्षण मंडळाला कळविण्यात आले असून हा बारावीच्या परीक्षांमधील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा समजला जात आहे.
बारावीच्या उत्तर पत्रिका तपासात घेतलेल्या असतानाच यातील तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेमध्ये दोन वेगवेगळे हस्ताक्षर असल्याची बाब उघडकीस आलेली होती. हे प्रकरण संशयास्पद असल्याने याबाबतची माहिती शिक्षण मंडळाला देण्यात आली. त्यानंतर शिक्षण मंडळाने या सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना नोटिसा पाठवून त्यांना चौकशीसाठी देखील बोलवण्यात आले.
विद्यार्थ्यांसोबतच केंद्रप्रमुख यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. पण दोन हस्ताक्षर कोणाचे आहेत? हे स्पष्ट होऊ न शकल्याने याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली. परंतु आता चौकशी समितीने दिलेल्या अहवालामुळे एकच खळबळ उडालेली आहे. कारण भौतिकशास्त्राच्या तीनशेपेक्षा अधिक म्हणजे तब्बल ३७२ उत्तर पत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे समोर आलेले आहे.
हा सर्व प्रकार समोर आल्यावर १५ मे पासून परीक्षा केंद्र संचालकांची सुनावणी घेण्यात येऊ लागली. हा प्रकार कुठे झाला. उत्तरपत्रिका जमा कधी केल्या, त्या कस्टडियनकडे कधी पाठवल्या, अशी केंद्र संचालकांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती. त्यानंतर पर्यवेक्षक, कस्टडियनचीदेखील सुनावणी घेण्यात आली. आता मॉडरेटरची सुनावणी घेतल्यानंतर हा प्रकार कसा व कुठे घडला, या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. आताच उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी बाहेर दिल्या होत्या की, सेंटरमध्येच ते मॅनेज केले होते, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.
तर, हा प्रकार बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत कसा घडला आहे?, भौतिकशास्त्राच्या ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर कसे काय आले?, यासाठी संबंधित सेंटरच मॅनेज झाले होते की, उत्तरपत्रिकाच बाहेर देण्यात आल्या होत्या?, परीक्षा झाल्यावर या प्रश्न पत्रिकेतील उत्तरे लिहिण्यात आली का?, प्रथमदर्शनी उत्तरपत्रिकांमध्ये अर्धवट राहिलेली उत्तरे एकाच व्यक्तीने लिहिलेली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे ती व्यक्ती कोण?, अशा प्रश्नांची आता राज्य शिक्षण मंडळकाडून आणि चौकशी समितीकडून तपास करण्यात येत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा