महाराष्ट्रात वेगवान घडामोडी,अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी १० ते १२ आमदार भाजपात प्रवेश करणार?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड हालचाली घडत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचादेखील राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी १० ते १२ आमदारांचा गट फुटून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण या सर्व घडामोडींना नेमकी सुरुवात कधीपासून झाली? याची माहिती समोर येत आहे.
अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. मधल्या काळात अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर येत या चर्चांचं खंडन केलं होतं. पण आता त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा थेट राजीनामा दिल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी पक्की असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी गेल्या आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. आपला पक्ष प्रवेश केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत व्हावा असे त्यांनी या भेटीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अमित शाह येत्या १५ फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस, पुढचे ७२ तास महाराष्ट्रात वेगवान घडामोडी
भाजपचं महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे. भाजप पडद्यामागे मोठी राजकीय खेळी खेळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. यामध्ये काँग्रेस आमदारांचादेखील समावेश आहे. भाजप नेत्यांची काँग्रेस नेत्यांशी बोलणी सुरु आहे. भाजप काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची खेळी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्षप्रवेश होणार आहे.
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण लवकरच भाजपात प्रवेश करणार, असं बोललं जात असतानाच, अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, येत्या एक ते दोन दिवसांत मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, पण कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचंही विधान त्यांनी केलं आहे.