फेब्रुवारी- मार्च हे दोन महिने उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक उष्ण महिने!
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात उष्णतेची लाट आली आहे. फेब्रुवारी महिन्यात आल्हाददायक वातावरणाऐवजी अधिक उष्णता जाणवत आहे. त्यामुळे फेब्रुवारी असूनही उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट आली आहे. यातील बहुतांश भागात कमाल तापमान 37 ते 39 अंशांवर पोहचले आहे. अशात पुढील आठवडाभर कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस उष्णतेमुळे अधिक त्रास होणार आहे. सूर्याची किरणे अधिक तापदायक ठरू शकतात.
समुद्रातील वार्यांचा वेग मंदावल्याने मुंबईतील कमाल तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना आता तीव्र उन्हाच्या छळा सहन कराव्या लागणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर राज्यांनाही उन्हाच्या तीव्र छळा सहन कराव्या लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता फेब्रुवारीतच हाय गर्मी म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांतून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. मुंबईत 7.6 अंशांनी तापमान वाढले आहे.
कसे असेल देशातील हवामान ?
देशभरातील हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास फेब्रुवारी महिन्यातच देशात मे महिन्यासारखी उष्णतेची लाट येणार आहे. यात 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीदरम्यान राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये तापमान 40 अंशांच्या आसपास जाणार आहे. तर पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड इत्यादी ठिकाणी तापमान 31 ते 36 अंशांच्या आसपास राहू शकते. तर 20 आणि 21 फेब्रुवारीला तापमान सर्वाधिक असू शकते. त्याचप्रमाणे देशाच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा 6 ते 12 अंशांनी जास्त असू शकते. त्याचबरोबर यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये उष्णता अधिक असेल, असेही हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे दोन महिने उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक उष्ण महिने ठरू शकतात.