ब्रेकिंग : राजीनामा नाट्यावर अखेर पडदा, शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. कुठंतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी हे धक्कातंत्र होतं. अशातच दोन दिवसाच्या नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी अखेर निर्णय जाहीर केला आहे.
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा एकमतानं नामंजूर करण्यात आला आहे. पवार हे देशाचे नेते आहेत, त्यांची राज्यासह देशाला गरज आहे, त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावं, अशी भावना सगळ्यांनी बैठकीत व्यक्त केली होती. त्यामुळे एकमताने राजीनामा नामंजूर करण्यात आलाय. एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे सादर करण्यात आलाय. या ठरावावर विचार करून निर्णय घेणार असल्यानं आपल्याला वेळ द्यावा अशी मागणी पवारांनी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.
काय म्हणाले शरद पवार?
लोक माझे सांगाती हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही, असं शरद पवार यांनी राजीनामा मागे घेत म्हटलं आहे. सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावं, या निर्णयाचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे, असं शरद पवार म्हणाले. आपण दर्शवलेलं प्रेम पाहून मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपल्या सर्वांनी केलेली आवाहनं तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय जो माझ्यापर्यंत पोहोचवला गेला. माझ्या निर्णयानंतर तीव्र भावना उमटली होती. जबाबदारीतून मुक्त होण्याची माझी इच्छा होती. देशभरातून विशेषत: विविध पक्षाच्या नेत्यांना मी अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती केली. राहूल गांधी आणि अन्य नेत्यांनी फोन करून मला विनंती केली, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हणाले आहेत.
भाकरी फिरवणार होतो, पण ती भाकरीच आता थांबली, असं म्हणत शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलंय. अजित पवार पत्रकार परिषदेला अनुपस्थित असल्याने शरद पवार यांचं हे वक्तव्य चर्चेत आलंय. नवं पद निर्माण करण्याची गरज नाही. ज्यांना जायचं असेल त्यांना थांबवू शकत नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. अजित पवार दिल्लीला गेले ही चूकीची आहे. सुप्रिया सुळे अध्यक्ष होईल, यात तथ्य नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. अजित पवारांना माझ्या राजीनाम्याची पूर्वकल्पना होती, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं होतं.