पुन्हा मास्क सक्ती? दोन दीवसात होणार निर्णय
मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। सध्या H3N2 ह्या विषाणूचा फैलाव होत आहे. त्यामुळे मास्क सक्ती व मास्क घालणे, हात धुवणे, अंतर ठेवणे या सुचना मी केलेल्या आहेत. अन्य निर्बंधांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या किंवा परवा या दोन दिवसात बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
H3N2 विषाणूबाबत मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहात माहिती दिली. त्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी निर्बंधांबाबत विचारणा केली. मास्क आता संयुक्तिक झाला आहे, असे दिल्ली एम्सचे संचालक गुलेरीया यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला तशा काही सुचना आल्या आहेत का?, याची काही मार्गदर्शक सुचना जारी केली जाणार आहे का?. यासाठी समिती नेमली आहे का?. अशी विचारणा करत याचा खुलासा करण्याची मागणी आमदार शेलार यांनी केली. त्यावर मंत्री तानाजी सावंत यांनी वरील उत्तर दिले.
दरम्यान, भारतात H3N2 इन्फ्लूएंजाचा विळखा वाढतोय. राज्यातही या रोगाची साथ पसरली असून सर्दी आणि खोकल्यामुळे अनेकजण हैराण आहेत. या विषाणूची लक्षणेही कोरोनासारखी असल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एमबीबीएसचं शिक्षण घेणारा एक विद्यार्थी बाहेर फिरायला गेला होता. तिथून आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती. तसेच, तो H3N2 बाधित असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना नागपुरात घडली आहे. नागपुरात ७५ वर्षीय व्यक्तीचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात H3N2 मुळे आतापर्यंत २ मृत्यू झाले असून संपूर्ण देशभरात या विषाणूमुळे चार जणांचा जीव गेला आहे.