तीन ऐवजी चार वर्षांचा पदवीचा अभ्यासक्रम! समान शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी राज्याची समिती
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे. त्यामुळे या सगळ्याची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली या धोरणाचा अभ्यास करून राज्य शासनास अहवाल जून 2021 मध्ये सादर केला गेला आहे. डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशीला अनुसरून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्रस्तावित केलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार सध्या सुरू असलेल्या तीन वर्षाचा अभ्यासक्रम चार वर्षाच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर करण्याची योजना व त्याबाबतचा आराखडा तयार करणे, त्यासोबतच राज्यभरात एक समान शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा तयार करणे व सामान्य अध्यापन शास्त्र ऐवजी विधायक अध्यापन शास्त्राचा वापर करणे यासंदर्भात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिकृत शिक्षणाचा आराखडा सुद्धा या समितीद्वारे तयार केला जाणार आहे. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे या समितीचे अध्यक्ष असतील त्यासोबत पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे डॉ पराग काळकर ,मुंबई विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ अजय भामरे मुंबई विद्यापीठाचे प्रा. राजेश खरात, नांदेड विद्यापीठाचे डॉ एल एम वाघमारे, डॉ अजय टेंगसे असे विविध विद्यापीठाचे एकूण 21 मान्यवर तज्ञ मंडळी या समितीमध्ये असतील
समितीची कार्यकक्षा नेमकी काय असणार ?
सदर समिती चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रमासाठी अध्यापन पद्धती व परीक्षेसाठी समग्र योजना तयार करेल. या योजनेत प्रात्यक्षिक आणि प्रकल्प अभ्यास तसेच मुख्य व वैकल्पिक विषयांना अंतर्गत व बहिस्थ प्रतीने मूल्यमापन गुणांकन आणि श्रेयांक पद्धतीचा समावेश असेल. चार वर्षे पदवी अभ्यासक्रम तयार करताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मापदंड याचाही विचार करून अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या प्रत्येक विषयाची निश्चित उद्दिष्टे परिणामांसह नमूद करण्यात येतील. चार वर्षे पदवी अभ्यासक्रम तयार करताना प्रत्येक वर्षाची किमान कौशल्य पातळी काय असावी ? याबाबत निश्चित मार्गदर्शक सूचना दिल्या जातील
विद्यार्थ्यांना स्व प्रेरणेने ज्ञान संपादन करता येईल नवोन्मेषी आणि सृजनशील संशोधक निर्माण होतील या दृष्टीने अभ्यासक्रमाचे स्वरूप निश्चित करेल. अभ्यासक्रम बहूविद्याशाखीय व संशोधनपर आधारित राहील यासाठी मार्गदर्शक सूचना समितीकडून देण्यात येतील सोबतच चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संशोधन घटक व औद्योगिक प्रशिक्षण कसे असेल ? याबाबत सुद्धा सूचना समितीकडून देण्यात येतील
अभ्यासक्रम स्वयंरोजगारभिमुक व व्यवसायभिमुक कसा राहील ? याबाबत विचार केला जाईल चार वर्षे अभ्यासक्रमाची एक समान शैक्षणिक संरचना निर्धारित करण्यासाठी आराखडा तयार केला जाईल यामध्ये मल्टिपल एन्ट्री एक्झिट व क्रेडिट ट्रान्स्फर या संदर्भात शैक्षणिक संरचना काय असेल ? हे ठरवलं जाईल या संदर्भातील सर्व अहवाल तीन महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या शासन निर्णय दिले आहेत