आज १ एप्रिल पासून ग्राहकांच्या खिशाला कात्री,काय स्वस्त, काय महाग
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशाच्या अर्थसंकल्प २०२२ मध्ये केलेल्या काही तरतुदींमुळे १ एप्रिल पासून ग्राहकांवर महागाईचा बोजा आणखी वाढणार आहे. उद्यापासून टीव्ही, एसी फ्रीजसह मोबाईल चालवणेही महागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षी फेब्रुवारी मध्ये बजेट सादर केला. या बजेटमध्ये अनेक उत्पादनांवर आयात शुल्क वाढविण्यात आले, तर काही उत्पादनांवर ते कमी करण्यात आले. हे नवे शुल्क १ एप्रिल पासून लागू होणार आहे. त्यामुळे ज्या कच्च्या मालावर उत्पादन शुल्क वाढवण्यात आले आहे, त्यांच्याशी संबंधित उत्पादनांच्या किमती वाढणार असल्याचे मानले जात आहे.
टीव्ही, एसी, फ्रीज महागणार
एलईडी बल्बच्या किमतीत वाढ,
मोबाईलच्या वाढत्या किंमतींमुळे खिशावर भार,
टेलिकॉम कंपन्याही धक्का
वायरलेस इयरबड्स आणि हेडफोन महागणार
सरकारने १ एप्रिलपासून अॅल्युमिनियम धातूंवर ३० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. याचा वापर टीव्ही, एसी आणि फ्रीजसाठी हार्डवेअर बनवण्यासाठी केला जातो. कच्च्या मालाच्या महागड्या पुरवठ्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढून त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडणार आहे. याशिवाय कंप्रेसरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरही आयात शुल्क वाढवण्यात आले आहे, त्यामुळे रेफ्रिजरेटरच्या किमती वाढणार आहेत. एलईडी बल्ब बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या सामग्रीवर मूलभूत सीमा शुल्कासह ६ टक्के प्रतिपूर्ती शुल्क आकारण्याचे सरकारने म्हटले आहे. १ एप्रिलपासून नवीन नियम लागू झाल्यानंतर एलईडी बल्बही महाग होणार आहेत.
दरम्यान सरकारने चांदीवरील आयात शुल्कातही बदल केला असून, त्यामुळे चांदीची भांडी आणि त्यापासून बनवलेली उत्पादनेही १ एप्रिलनंतर महाग होणार आहेत. याशिवाय स्टीलच्या वस्तूंनाही महागाईचा फटका बसणार असून उद्यापासून स्टीलची भांडी महागणार आहेत. मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या प्रिंटेड सर्किट बोर्डवरही सरकारने कस्टम ड्युटी लावली आहे. म्हणजेच बाहेरून या उत्पादनांची आयात आता महाग होणार असून, त्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर होणार आहे. अमेरिकन फर्म ग्रँट थ्रॉन्टनच्या मते, सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असून मोबाईलच्या किमती वाढू शकतात. आतापर्यंत टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना मोफत अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग सुविधा देत होत्या.
मात्र ३१ मार्च रोजी ही सेवा समाप्त होईल. अशा परिस्थितीत 4G मार्केटमधील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अशा ग्राहकांना आता टॅरिफ प्लॅन निवडावा लागणार असून त्यांच्यावर मोबाईल चालवण्याचा खर्चही नकळत वाढणार आहे. अर्थसंकल्पात सरकारने वायरलेस इअरबड्समध्ये वापरल्या जाणाऱ्या काही उपकरणांवर आयात शुल्क वाढवले आहे, ज्यामुळे त्यांचे उत्पादन महाग होणार आहे. दरम्यान वायरलेस इयरबड्स बनवणाऱ्या कंपन्या एप्रिलपासून त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात. याशिवाय, प्रीमियम हेडफोन्सच्या आयातीवरही शुल्क वाढणार आहे, त्यामुळे १ एप्रिलनंतर हेडफोन खरेदी करणे ग्राहकांना महागात पडणार आहे.
‘ही’ उत्पादने होतील स्वस्त
बजेटमध्ये स्मार्टफोनशी संबंधित अनेक उत्पादनांवरील आयात शुल्कही कमी करण्यात आले आहे. यामध्ये मोबाईल चार्जर, ट्रान्सफॉर्मर, कॅमेरा लेन्स मॉड्यूल यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. नवीन शुल्क लागू झाल्यानंतर संबंधित उत्पादनांच्या किमती कमी होऊ शकतात. सरकारने स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडच्या काही भागांवरील उत्पादन शुल्कही कमी केले आहे, त्यामुळे एप्रिलपासून ही उत्पादने काहीशी स्वस्त होऊ शकतात.