इंधन दरवाढीचा भडका,पेट्रोल डिझेलची मोठी दरवाढ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशात सध्या महागाईचा भडका उडाला असून चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कालचा एक दिवस विश्रांती घेत आज पुन्हा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या चार दिवसांत एकूण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २.५० रुपयांची वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे गाडी चालवणेही कठीण झाले आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल ९७.८१ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८९.०७ रुपये प्रति लीटर इतके झाले आहे. तसेच आज पेट्रोल ८४ पैशांनी तर डिझेल ८५ पैशांनी वाढल्यामुळे मुंबईत आज पेट्रोलची किंमत ११२.५१ रुपये झाली असून डिझेल ९६.७० रुपये झाले आहे. तसेच नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत ११२.९० तर डिझेलची किंमत ९५.६५ रुपये इतकी झाली आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचे परिणाम इतर ठिकाणीही दिसून येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
तसेच या आठवड्याच्या सुरुवातीला २२ आणि २४ मार्चला इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती. १३७ दिवसांच्या विश्रांतीनंतर ही वाढ करण्यात आली आहे. २२ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर २३ मार्च रोजी या दोन्ही इंधनांच्या किमती ८०-८० पैशांनी वाढल्या होत्या. तर दररोज या वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तर युक्रेन आणि रशिया मधीलयुद्धाचाही परिणाम या दरवाढीवर होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. या वाढत्या महागाईची दखल सरकारने घ्यावी. सरकारने सवलती द्याव्यात अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान ४ नोव्हेंबर रोजी शहरात पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होते. ३ नोव्हेंबर रोजी शहरात पेट्रोलचा दर ११५.८५ रुपये प्रतिलिटर होता. त्याचवेळी डिझेल १०६.६२ रुपये प्रतिलिटर होते. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात जाहीर केल्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंधनाचे दर कमी करण्यात आले होते.