धनुष्यबाणाची आशा सोडली? ‘नव्या चिन्हांची तयारी ठेवा!’ उद्धव ठाकरे यांच शिवसैनिकांना आवाहन
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ‘नव्या चिन्हाची तयारी ठेवा’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलंय. ते पाहाता पक्षाचे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न होणार आहे. कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी गाफील न राहाता शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केलं आहे. 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रेवर 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमकी शिवसेना कुणाची याबाबतही स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
शिंदेचा वाढता पाठिंबा
महाविकास आघाडीबोत सत्तेत राहून शिवसेनेचं नुकसान होत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे गटाने केला आहे. त्यासाठी बंडखोरी नव्हे, तर उठाव केल्याचा दावा शिंदे गटातील आमदारांकडून केला जातो. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या 40 शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहेत. खासदारांचाही पाठिंबा वाढत असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे वेगवेगळ्या नगरपालिकांमधील नगरसेवकही आता हळूहळू शिंदे गटात सामील होत आहेत.
कुणासमोरची काय आव्हानं?
शिवसेनेचे आमदार फोडणं जितकं, सोप्प होतं, तितकी अख्खी शिवसेना फोडणं सोप्प नाही, हेही महत्त्वाचंय. अशातच आता वाद कोर्टात आहे. शिवसेना नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांना वाढता पाठिंबा आहे. ठाणे, पुणे त्यानंतर नवी मुंबई अशा पालिकांमधील नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याबाजूने उभे राहत आहेत. मात्र नगरसेवक यांच्यासोबत सरपंच, शिवसेनेचे पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्ते अशांचीही फूट पाडल्यानंतर एकनाथ शिंदेची खरी ताकद वाढणार आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह जर त्यांना आपलंसं करायचं असे, तर त्यासाठी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षातच उभी फूट पडलेली आणि दोन तृतीआंश शिवसेनेतील लोकं आपल्या बाजूने आहेत, हे सिद्ध करावं लागणार आहे, असं जाणकार सांगतात.
‘सुप्रीम’ सुनावणीकडे लक्ष
येत्या 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात बंडखोर आमदारांच्या प्रश्नावर सुनावणी होणार आहेत. आता सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं, याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचं काय होणार? या प्रश्नावर 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात वादळी युक्तिवाद होण्याची शक्यता वर्तवली जातेय.