“तलाठी व्हायचंय,दहा लाख द्या” थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राज्यातील तलाठी भरती परीक्षेचा वाद आता वाढत चालला. काही महिन्यापूर्वी घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल हा काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. पण या परीक्षेतील काही विद्यार्थ्यांना 200 पैकी अधिक गुण मिळाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या परीक्षेबाबतचे अनेक वादग्रस्त मुद्दे समोर येत आहेत. सुरुवातीला या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल एक हजार रुपये फी आकारणी घेण्यात आली होती. त्यानंतर, परीक्षेत झालेली पेपरफुटी झाली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. “थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा आणि दहा लाखात तलाठी व्हा अशा पद्धतीने उमेदवारांना अमिष दाखविले जात आहे. या सर्व घटना समोर आल्यावर देखील सरकार गंभीर नसल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे उमेदवारांना वेळेत न पोहोचता आल्याची अडचण अशा असंख्य कारणांमुळे तलाठी भरतीची परीक्षा ही नेहमीच वादग्रस्त ठरली. त्यामुळे आता गुणांमध्ये घोळ झाल्यानंतर विरोधकांकडून हा मुद्दा लावून धरण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सरकारवर आरोप केल्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भरती प्रक्रियेत कशाप्रकारे घोटाळा झाला, याची माहिती वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून माहिती दिली.
दरम्यान, याबाबत ट्वीट करत वडेट्टीवार म्हणाले आहेत की, “पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हे पुढे आले आहे. टीसीएसने आऊटसोर्स केलेल्या खासगी सेंटरवरील 19 हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये किमान 9 आरोपी समान आहेत आणि त्यांची मोडस ऑपरेंटी सारखीच आहे. दहा लाखात तलाठी व्हा! थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा! अशा पद्धतीने उमेदवारांना अमिष दाखविले जात आहे. परीक्षा सुरू होताच काही वेळात प्रश्नपत्रिका बाहेर येतात. या परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी 3 लाख रूपये घेतले जातात. तळपायाला चिप लावून हिडन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन केली जाते. हे सगळे प्रकार समोर आले आहेत. तरीही सरकार गंभीर नाही, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
याआधी देखील विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे. आता वडेट्टीवर पोस्ट करत सांगितले की, “राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेत पत्रिका काढावी तसेच सर्व परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात याव्यात ही मागणी मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करायला हवा. सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले गेले आहे. पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी टी.सी.एस. व इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात यावी. पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. या संपूर्ण पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी.”